महापालिकेत दोन दिवसांत तब्बल ६०६८ हरकती; गुरुवारपर्यंत मुदत
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव महापालिकेने २० नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश भोळे यांनीही मंगळवारी आयुक्तांची भेट घेत मतदार याद्यांतील चुका तातडीने सुधाराव्यात, अशी मागणी केली आहे. प्रभागांमधील नागरिकांची नावे चुकीच्या ठिकाणी टाकली गेल्याने अनेकांना आपल्या मतदानाचा हक्क धोक्यात येईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
महापालिकेच्या निवडणूक विभागात आज एकट्या दिवसात तब्बल २२७३ हरकती प्राप्त झाल्या. यापैकी २०२३ हरकती नागरिकांकडून तर २५० हरकती इच्छुक उमेदवारांकडून दाखल करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण ६०६८ हरकती प्राप्त झाल्या असून मतदार याद्यांवरील नाराजीचा पातळीवरून अंदाज येतो.
आमदार भोळे म्हणाले की, प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे चुकीच्या यादीत आढळतात. यामुळे नागरिकांनी केलेल्या हरकतींची दखल घेऊन त्यांच्या नावांची योग्य प्रभागात दुरुस्ती केली जावी. नागरिकांबरोबरच अनेक राजकीय पक्षांनीही या घोळाबाबत आक्षेप नोंदवले आहेत.
महापालिकेकडून हरकती स्वीकारण्याची अंतिम मुदत गुरुवार, २७ नोव्हेंबरपर्यंत असून त्या पार्श्वभूमीवर आज व उद्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मतदार यादी दुरुस्तीसाठी प्रशासन कितपत तातडीने कार्यवाही करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.









