नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;– आपण शेतकरी असल्यास आपल्यासाठी ही बातमी महत्त्वपूर्ण आहे. खरिपाच्या पिकांना दुष्काळ, पूर, भूस्खलन, अवकाळी पाऊस, गारपीट, कीटकांचे हल्ले, नैसर्गिक अग्नि आणि चक्रीवादळ यांसारख्या जोखमीपासून संरक्षण द्यायचे असेल तर पंतप्रधान पीक विमा योजना घ्या. आता पीक विम्यासाठीचे रजिस्ट्रेशन मोफत केले आहे. फक्त प्रीमियम जमा करावा लागेल. धान्य व तेलबिया या पिकासाठी केवळ 2 टक्के तर वाणिज्यिक आणि बागायती पिकांसाठी विम्याच्या रक्कमेवर 5 टक्के इतका विमा उतरविला जाऊ शकतो. उर्वरित प्रीमियम हा केंद्र सरकार व राज्य सरकार जमा करतील.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना आपल्या पिकांचा विमा उतरवावा असे आवाहन केलेले आहे, जेणेकरून पिकांचे नुकसान होण्याचा धोका कमी होऊ शकेल. कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते. केंद्रशासित प्रदेशात त्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे.
कृषिमंत्री याबाबत म्हणाले की, ही पीक विमा योजना पिकाच्या पेरणीपासून काढणीपर्यंत संपूर्ण पीक चक्र कार्यात होणाऱ्या नुकसानीविरूद्ध संरक्षण मिळवून देते. खरीप हंगाम -2020 पासून सरकारने ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक केली आहे. तर सरकारी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना अनिवार्य होती.








