विद्यार्थ्यांचे कला सादरीकरण
शिरसोली (वार्ताहर) : बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन “जल्लोष २०२५”मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्नेहसंमेलनाचे उद्घाटक विद्यालयाचे चेअरमन अशोक अस्वार हे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यमान संचालक तथा शालेय समितीचे सदस्य निलेश खलसे, संचालक प्रवीण पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आबिटकर, शिरसोली बीटचे केंद्रप्रमुख सुशील पवार हे उपस्थित होते. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीचे पूजन करून त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सदर स्नेहसंमेलनात अतिशय दर्जेदार ,रंगतदार व बहारदार, कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन या स्नेहसंमेलनात पाहायला मिळाले. गावातील विद्यार्थ्यांचे पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांस्कृतिक विभागाचे प्रमुख दीपक कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.घनश्याम काळे, देवका पाटील, नेत्रा वाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद मराठी विद्यालयाचे उपशिक्षिका तृप्ती भदाणे, अर्चना कुमावत यांनी परीक्षकाचे कामकाज सांभाळले. सुमारे चार तास विद्यार्थी पालक नागरिकांना स्नेहसंमेलनाचा आनंद घेता आला. शेवटी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण पाटील यांनी आभार मानले. या संमेलनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.