आ. मंगेश चव्हाण यांनी डीपीडीसी बैठकीत दिली माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी दि. २७ रोजी पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी आ. मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघासह जळगाव जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले.
प्रामुख्याने चाळीसगाव तालुक्यात वीज वितरण कंपनीत बाह्यस्त्रोत कामगार नियुक्तीत भ्रष्टाचार होत असून सबंधित एजन्सीला कार्यारंभ आदेशात दिलेल्या अटी शर्तींची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आणून दिले, वीज वितरण कंपनी मार्फत पाणी पुरवठा योजनांच्या कनेक्शन साठी पाठपुरावा करूनदेखील अंदाजपत्रके मिळत नसल्याने अनेक योजना रखडल्याचे यावेळी सांगितले. प्रादेशिक वनविभाग व वन्यजीव विभागांतर्गत घळी बांध, दगडी बांध, समतल चर तयार करणे, अश्या प्रकारच्या मंजूर कामांच्या एजेन्सी हे डीएफओ व आरएफओ सुचवतात व थातूरमातूर कामे करून बिले काढली जातात.
गेल्या १० वर्षातील कामांचे ऑडीट करून त्याचा अहवाल पुढील डीपीडीसी बैठकीत सादर करण्याची यावेळी मागणी केली. यासोबतच राष्ट्रीय महामार्ग ७५३ जे व २११ यांच्याबाबत असलेल्या तक्रारी, चाळीसगाव आगरात नवीन एस.टी.बसेस मिळाव्या, जिल्हा परिषद मार्फत नवीन रस्ते दर्जोन्नती व पडक्या शाळांचे निर्लेखनसाठी गेल्या वर्षभरापासून केली जाणारी टाळाटाळ यानुषंगाने मुद्दा आ. मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केला.