पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती, प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण
जळगाव (प्रतिनिधी) : येत्या काळात जिल्हा आरोग्य सेवेचे केंद्र बनणार असून जळगाव शहराच्या जवळ चिंचोली येथे सर्व सुविंधायुक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ६५० खाटांचे रुग्णालय लवकरच सुरु होणार असून सिंचनाच्या दृष्टीनेही जिल्ह्यातील ८ प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर १ लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले, याप्रसंगी पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी शुभेच्छा संदेश देताना सांगितले की, जळगाव जिल्हा आरोग्य सुविधाचे केंद्र बनत असून जिल्ह्यातील सर्व सामान्यांच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन आणि एमआरआय सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे शेकडो गरीब रुग्णांचा मोफत उपचार आधार बनतो आहे.
युवकांच्या कल्याणासाठी शासन करत असलेल्या कामाची माहिती देताना पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४ हजार ५८५ युवकांना रोजगार उपलब्ध झाला असून जळगावमध्ये आधुनिक विभागीय क्रीडा संकुल उभारले जात आहे. यामध्ये प्रशिक्षण सुविधा आणि मैदानांचा समावेश असेल, त्यामुळे तरुणांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळेल,यातून आंतरराष्ट्रीय क्रीडापटू तयार होतील अशी अपेक्षाही व्यक्त केली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ६०७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, जिल्ह्याने निधी वितरणात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.तर आदिवासी उपयोजनाच्या निधी वितरणात जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक असल्याचे पालकमंत्र्यांनी नमुद केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी , “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या धोरणाच्या आधारे जळगाव जिल्हा आदर्श जिल्हा बनविण्याचा शासनाचा उद्देश आहे. भारतीय लोकशाहीचे ७५ वर्षांचे यश साजरे करताना जिल्ह्याच्या विकासासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. पोलीस दल, होमगार्ड, अग्निशमन दल, राष्ट्रीय सेवा योजना, गाईडचे विद्यार्थी यांचे पोलीस बँडच्या धुनवर अत्यंत मनमोहक पथ संचलन झाले.