मयत चोपडा सूतगिरणीचे संचालक : शिरपूर शहरात महामार्गावरील घटना
शिरपूर (प्रतिनिधी) : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दि. २४ जानेवारी रोजी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील पती ठार झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाणपुलाजवळ घडला. मृत व्यक्ती ह्या चोपडा येथील सहकारी सूतगिरणीचे संचालक आहेत.
विनायक संतोष सोनवणे (वय ६०, रा. चहार्डी, ता. चोपडा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी सीमा सोनवणे गंभीर जखमी आहेत. त्यांना धुळे येथे उपचारासाठी हलविले आहे. सोनवणे यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. विनायक सोनवणे पत्नीसह अनरद ता. शहादा येथे अंत्ययात्रेसाठी जात होते. सकाळी १० वाजता मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल नीलापुढे उड्डाणपुलाखालील रस्त्यावरून शिरपूरकडे वळत असताना त्यांच्या दुचाकीला (एमएच १९, डीडब्ल्यू ४९५४) ट्रक (एमपी ०९, एचएच ३०२३) ची धडक लागली. या अपघातात पती व पत्नी गंभीर जखमी झाले. पुलाखाली उभे असलेल्या नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून दोघा जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात विनायक सोनवणे यांना मयत घोषित केले. सीमा सोनवणे यांच्यावर प्रथमोपचार करून धुळे येथे रवाना करण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच शिरपुरातील सोनवणे यांचे नातेवाईक, भाऊ, मुलगी व मुलगा रुग्णालयात पोहोचले. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.