पारोळा तालुक्यातील कंकराज येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झाल्याने तालुक्यातील कंकराज येथील ४९ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उपचाराअंती त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
देविदास शामराव पाटील (वय ५५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. देविदास पाटील यांच्या एक बिघा शेतातून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने त्यांच्यावर कर्जाचा मोठा बोजा वाढला होता. या निराशेमुळे त्यांनी आपल्या स्वतःच्या घरात दोरीने ६ जानेवारी रोजी गळफास घेतला. घटना समजल्यावर नातेवाइकांनी त्यांना कुटीर रुग्णालय येथे दाखल केले. त्यानंतर धुळे येथील जिल्हा रुग्णालयात गेल्या १५ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असताना १९ जानेवारी रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर परिवाराने शोक व्यक्त केला. पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.