पाचोरा तालुक्यात नगरदेवळाजवळ घटना
जळगाव (प्रतिनिधी) : धावत्या रेल्वेखाली आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. २१ रोजी रात्री २.१० वाजेपूर्वी नगरदेवळा रेल्वेस्टेशन परिसरात डाऊन लाईनवर घडली. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविला. त्याच्या अंगझडतीत मिळालेले आधार कार्ड आणि एका कागदावर लिहिलेल्या मोबाइल क्रमाकांवरुन पोलिसांनी अवघ्या दोन तासात ओळख पटविली.लोहमार्ग पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बाळासाहेब हिरामण सोनवणे (वय ३६, रा. पिचर्डे) असे मृत तरुणाचे नाव आहे. नगरदेवळा रेल्वे स्टेशन परिसरात किमी नं. ३५४/११ जवळ रात्री दोन वाजेपूर्वी डाऊन लाईनवर धावत्या रेल्वेखाली अनोळखीचा मृत्यू झाला. ही माहिती पाचोरा लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यानुसार लोहमार्गाचे एएसआय रामराव इंगळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी नगरदेवळा रेल्वेस्टेशन परिसरात धाव घेतली. रुग्णवाहिकेतून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविला. मृताची पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये आधारकार्ड तसेच काही कागद मिळुन आले. कागदावर १ मोबाईल क्रमांक लिहिलेला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास चक्र गतीमान फिरविले. कागदावरील क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधला असता मृत तरुणाची ओळख पटली. बाळासाहेब सोनवणे असे मृताचे नाव स्पष्ट झाले. अवघ्या दोन तासात लोहमार्ग पोलिसांना अनोळखीची ओळख पटविण्यात यश मिळाले. मंगळवार दि. २२ रोजी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेतवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.