पहूर पोलीस स्टेशनची कारवाई
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पहूर पोलिस ठाणे हद्दीतील शेतकऱ्यांच्या केबल चोरीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले असून केबल चोरी करणाऱ्या नेरी दिगर येथील एकास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून २० हजारांची तांब्याची तार जप्त केली आहे.
पहुर पोलिस ठाण्यात सुधाकर देवराम जाधव व इतर शेतकऱ्यांच्या २१ ऑक्टोबर २०२४च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विहिरीतील पाण्याचे पंप व सोलरच्या केबल चोरुन नेल्याप्रकरणी सुधाकर जाधव यांच्या फिर्यादीवरुन पहुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सखोल तपास करुन तसेच तांत्रिक बाबी व गुप्त बातमीच्या आधारे नेरी दिगर येथील संशयित आरोपी शेख मोहम्मद शेख शब्बीर (वय ४२) यास अटक केली आहे. त्याच्याकडून २० हजार रुपयांची वायर जाळून तयार केलेले तांबेचे तार जप्त करण्यात आले आहेत. तर या गुन्ह्यात सहभागी आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
पहुर पोलिस ठाणे हद्दीतील शेतकऱ्यांच्या केबल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, पो.नि. सचिन सानप, उपनिरीक्षक भरत दाते, पो.हे.कॉ. दीपक सुरवाडे, पो.ना. राहुल पाटील व ज्ञानेश्वर ढाकरे, पो.कॉ. विनोद पाटील, गोपाल गायकवाड, राहुल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे ईश्वर पाटील, राहुल महाजन यांनी केली.