पुणे (वृतससंस्था) – करोनामुळे मिळकतकर विभागाचीही ‘करुणा’जनक परिस्थिती झाली आहे. दोन महिन्यांत मिळकतकरापोटी पालिकेच्या तिजोरीत 280 कोटी रुपये जमा झाले आहेत. सुमारे सव्वादोन लाख मिळकतदारांनी ही रक्कम जमा केली आहे.
या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच लॉकडाऊन जाहीर केला गेला. 11,232 जणांनी धनादेशाद्वारे आणि 9,311 जणांनी रोख स्वरुपात तर, उर्वरित करदात्यांनी ऑनलाइन मिळकत कराचा भरणा केला आहे. यात एकूण 2 लाख 9 हजार 564 जणांनी सुमारे 223 कोटी 43 लाख रुपये कर जमा केला आहे.
महापालिकेच्या हद्दीत सुमारे 10 लाख 57 हजार 716 मिळकती आहेत. यातून यंदा 1,511 कोटी रुपये मिळकत कर मिळेल, असा अंदाज आहे. महापालिकेच्या जुन्या हद्दीतील 9 लाख 13 हजार 855 आणि नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांतील 1, 43, 861 मिळकतींचा यात समावेश आहे. यातून अनुक्रमे 1,365 कोटी रुपये आणि 146 कोटी रुपये कर जमा होण्याचा अंदाज आहे.
सवलत मिळवण्यासाठी दोनच दिवस शिल्लक
मिळकत कराची रक्कम 31 मेपर्यंत जमा करणाऱ्यांना मिळकत करात 5 ते 10 टक्के सवलत दिली जाते. ही सवलत मिळवण्यासाठी दोनच दिवस शिल्लक आहेत. या दोन्ही दिवशी महापालिकेला कार्यालयीन सुट्टी असून, कर भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्रावर सेवा उपलब्ध आहे. याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 आहे. करोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी मिळकत कर ऑनलाइन भरण्यास प्राधान्य द्यावे; असे आवाहन विभागप्रमुख विलास कानडे यांनी केले आहे.