मुंबई (वृतससंस्था) – कोरोनाला आटोक्यात ठेवण्यासाठी नागपूरमध्ये राबवलेला ‘तुकाराम मुंढे पॅटर्न’ चांगलाच प्रभावी ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांनी नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेना जिल्हाध्यक्षांनी मुढेंच्या कामाचे कौतुक केले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि भाजपकडून मात्र मुंढे मनमानी कारभार करतात असा आरोप केला आहे. त्यामुळे कोरोना काळात नागपूरमध्ये भाजप, काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार असल्याचं चित्र आहे.
नुकतंच शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांनी तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. जवळपास 40 मिनिटे प्रकाश जाधव-तुकाराम मुंढेसोबत विविध उपाययोजनांबाबत चर्चा करत होते. या चर्चेनंतर प्रकाश जाधव यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंच्या पाठीशी शिवसेना उभी आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
तसेच नागपुरात कोरोना नियंत्रणासाठी मुढेंनी अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्या सर्व उपाययोजनांचंही शिवसेना जिल्हाप्रमुखांनी कौतुक केलं. तसेच शिवसेना तुमच्या पाठीशी आहे असेही ते म्हणाले.
तर दुसरीकडे भाजप आणि काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेते तुकाराम मुढेंवर अनेक आरोप केले होते. नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे मनमानी कारभार करतात, असा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केला होता. तसेच त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावही आणू असा इशाराही भाजप आणि काँग्रेसने दिला होता.
यानंतर आता शिवसेनेने तुकाराम मुढेंची पाठ थोपटली आहे. त्यामुळे ऐन कोरोना काळात नागपूरमध्ये भाजप, काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार असल्याचं चित्र आहे.