जळगाव बसस्थानकात चोऱ्या सुरूच, पोलिसांना आव्हान
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील नवीन बसस्थानक आवारातील प्लॅटफॉर्म नंबर ५ येथे बसमध्ये चढत असतांना एका महिलेच्या पर्समधून ९५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना सोमवारी २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपिका अजय कुमार तिवारी (वय-३२, रा. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर) या महिला नातेवाईकांना भेटण्यासाठी जळगावात आलेल्या होत्या. त्यानंतर पुन्हा गावाला जाण्यासाठी त्या सोमवारी दि. २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहरातील नवीन बसस्थानक येथील प्लॅटफॉर्म नंबर ५ येथे आलेल्या होत्या. त्यावेळी जळगाव ते वैजापूर बस क्रमांक (एमएच ४० एन ९६६८) मध्ये बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ९५ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना उघडकीला आल्यानंतर महिलेने बस आवारात सर्वत्र शोध घेतला. मंगळवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल अलका शिंदे ह्या करीत आहे.