जळगावच्या पिंप्राळा हुडकोत तणावपूर्ण वातावरण ; तरुणाचा मृत्यू, ७ जखमी
जळगाव (प्रतिनिधी) : पळून जाऊन प्रेम विवाह केला या कारणामुळे संतापलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी तरुणासह त्याच्या कुटुंबीयांवर कोयते आणि चॉपरने जबर वार करून तरुणाचा खून केला तर कुटुंबियांना गंभीर जखमी केल्याची फिर्याद रामानंदनगर पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. याप्रकरणी ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काहींची धरपकड करण्यात आली आहे.
याबाबत मयताचा भाऊ सोनू रमेश शिरसाठ (वय २२, रा. भीम नगर, पिंप्राळा हुडको, जळगाव) याने फिर्याद दिली आहे. त्याचा भाऊ मुकेश शिरसाठ याने ३ ते ४ वर्षांपूर्वी पूजा शिरसाठ यांच्याशी पळून जाऊन प्रेमविवाह केला आहे. तसेच फिर्यादीच्या वहिनी पूजा यांचे आई,वडील व भाऊ हे त्यांच्या घरापासून काही अंतरावर राहतात. मुकेश याने पळून जाऊन प्रेम विवाह केला याचा राग पूजा शिरसाठ यांच्या माहेरच्यांना होता. (केसीएन)त्यातूनच रविवारी दि. १९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मुकेश शिरसाठ हा दुकानावर वस्तू आणण्यासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी पूजा शिरसाठ यांचे काका सतीश केदार, भाऊ प्रकाश सोनवणे तसेच त्यांच्यासोबत सुरेश बनसोडे, बबलू बनसोडे, राहुल सोनवणे, पंकज सोनवणे, अश्विन सुरवाडे, विकी गांगले, बबल्या गांगले व इतर दोन अनोळखी हे घटनास्थळी आले.
त्यांनी मुकेश याला सांगितले की, तू पुजाशी पळून जाऊन लग्न केले. तुझ्या परिवाराला यापूर्वी आम्ही सोडून दिले होते. आता मात्र आम्ही तुझ्या परिवाराला संपवून टाकू असे सांगून त्यांनी त्यांचेसोबत आणलेले कोयते आणि चॉपरने मुकेशच्या मानेवर गंभीर वार केला.(केसीएन) तेव्हा तो जोरजोरात ओरडू लागल्याने फिर्यादी सनी शिरसाठ, त्याचे आई-वडील तेथे आले असता त्यांनाही संशयित आरोपींनी मारहाण करण्यास सुरुवात केली. सनी शिरसाठ यांच्या उजव्या बोट्याच्या अंगठ्याला आणि पाठीमागून वार केले. तेव्हा फिर्यादीचे काका निळकंठ शिरसाठ व त्यांची मुले करण, कोमल, काकू ललिता, लहान मुलगा आणि हे तक्रार करण्यास रामानंदनगर पोलीस स्टेशनला जात असताना त्यांना संशयितांनी अडवले.
त्यानंतर संशयित आरोपी सतीश केदार व इतर संशयित आरोपींनी निळकंठ शिरसाठ, ललिता शिरसाठ, करण, कोमल शिरसाठ यांना शस्त्राने जबर मारहाण करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर गंभीर जखमी मुकेश शिरसाठ हा मयत झाला आहे तर इतर कुटुंबीयांमध्ये ७ जण हे जखमी झाले आहेत.(केसीएन) फिर्यादीवरून सतीश केदार, प्रकाश सोनवणे, सुरेश बनसोडे, बबलू बनसोडे, राहुल सोनवणे, पंकज सोनवणे, अश्विन सुरवाडे, विकी गांगले, बबल्या गांगले व इतर अशा ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी चार ते पाच संशयित आरोपींची धरपकड केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान खुनाच्या घटनेमुळे पिंप्राळा हुडकोत तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे.