सहा मंत्र्यांचा झाला गेम : तिघांना बनवले सहपालकमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह बावनकुळेंकडे २ जिल्हे
जळगाव (विशेष प्रतिनिधी) : अखेर बहुप्रतिक्षित पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे महाराष्ट्रातील ४२ मंत्र्यांपैकी ३० मंत्र्यांकडे पूर्ण जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद असून तीन जिल्ह्यात मुख्य पालकमंत्र्यांसह सहपालकमंत्री पद आहे. मंत्रिमंडळातील चार कॅबिनेटसह दोन राज्यमंत्र्यांकडे कुठल्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळालेले नाही.
पालकमंत्री पद न मिळालेले मंत्र्यांमध्ये भाजपचा एकही मंत्री नाही तर शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले, दादा भुसे या कॅबिनेट मंत्र्यांसह राज्यमंत्री योगेश कदम यांचा समावेश आहे. तर अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे, धनंजय मुंडे यांच्यासह राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडेदेखील कुठलेही पालकमंत्री पद देण्यात आलेले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपकडे २० मंत्री असून शिंदे गटाकडे १३ व अजित पवार गडाकडे ९ मंत्री आहेत.
भाजपने त्यांच्या सर्व मंत्र्यांना पालकमंत्री व सह पालकमंत्री अशी जबाबदारी दिलेली आहे. आता शिंदे गटात आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये पुन्हा एकदा सुंदोपसुंदी होण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये आता पुन्हा एकदा काही प्रमाणात तणाव निर्माण होईल काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पालकमंत्र्यांची यादी पाहिली तर भाजपने पुन्हा एकदा त्यांचेच वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांना पालकमंत्री केले असले तरी त्यांच्या जोडीला सहपालकमंत्री म्हणून भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सहपालकमंत्री म्हणून शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांची नियुक्ती केली आहे.
याचप्रमाणे मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी भाजपचेच आशिष शेलार यांना पालकमंत्री तर मंगल प्रभात लोढा यांना सहपालकमंत्री करण्यात आले आहे. एकीकडे सह पालकमंत्री बनवण्याची नेमकी मुख्यमंत्र्यांना काय गरज पडली हा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झालेला असला तरी मात्र दुसरीकडे तिघांकडे दोन जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे प्रत्येकी दोन्ही जिल्हे आकारांनी मोठे असल्यामुळे तेथे केवळ एक पालकमंत्री नेमल्यामुळे त्या त्या जिल्ह्यांना खरोखर न्याय मिळेल काय ? हा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यासह मुंबई शहराचे पालकमंत्री पद मिळवले आहे. दुसरीकडे आकाराने मोठा असलेला पुणे जिल्हा याच्यासह अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या बीड जिल्हा यांचे पालकमंत्रीपद दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. त्याचबरोबर आकाराने मोठे असलेले नागपूर व अमरावती या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद हे राज्याचं महत्त्वाचं महसूल खात असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आले आहे. या गोष्टी मात्र न समजण्यासारखे आहेत, अशा प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत आहेत.
भरत गोगावले, दत्तात्रय भरणे, दादा भुसे यांना प्रत्येकी एक जिल्हा मिळावा व उपमुख्यमंत्र्यांसह बावनकुळेंना त्या जिल्ह्यांच्या विकासाचां विचार करून एकच जिल्हा देण्यात यावा अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे. दुसरीकडे मेघना बोर्डीकर आणि डॉ. पंकज भोयर हे राज्यमंत्री असताना त्यांच्याकडे अनुक्रमे परभणी व वर्धा या पूर्ण जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आल्यामुळेदेखील आश्चर्य व्यक्त होत आहे.