श्रीमद् भागवत कथेत नृसिह अवताराने वेधले लक्ष, कथा-कीर्तनात भाविक दंग
जळगाव (प्रतिनिधी) : देवाची निस्वार्थपणे सेवा करा. भगवंताच्या कृपेने दुसऱ्याने केलेली निंदा सुद्धा एक दिवस श्रुती झाल्याशिवाय राहणार नाही. निंदेतूनही चांगले घडून येते. रंजल्या-गांजल्यांची सेवा करा, तीच ईशसेवा म्हणून पूर्ण होते, असे प्रतिपादन आ. राजूमामा भोळे यांनी केले.
येथील जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळातर्फे दि. १५ ते २२ जानेवारीपर्यंत जुने जळगाव येथील बदाम गल्लीत संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दररोज रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील विविध कीर्तनकार त्यांच्या सुश्राव्यवाणीतून कीर्तन करीत आहेत. शनिवारी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती करण्यात आली. श्रीमद् भागवत कथेत इतिहास, भूगोल याचे ज्ञान होते. जर कथेचा सखोल अभ्यास केला तर ते देहाचे विज्ञान आहे. आपल्यासाठी संतांनी लिहिलेला उपदेश आहे. त्यामुळे देहाच्या उद्धारासाठी परमेश्वराचे आचरण, चिंतन केले पाहिजे, असे प्रतिपादन बीड येथील भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामीजी यांनी चौथ्या दिवशी केले.
स्वामींनी ध्रुवाची कथा वर्णन केली. त्यात ते म्हणाले की, गुरु शिवाय मानवाला ज्ञान मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकाने गुरु केला पाहिजे. ‘झूठा है संसार धोका खायेगा.. छोटा है संसार, करले प्रभू से प्यार फिर पछतायेगा..’ असे म्हणत आपलं सर्व जीवन परमेश्वर समर्पित करा, असा संदेशही भागवताचार्य श्री हरिहरानंद भारती स्वामीजी यांनी दिला. यावेळी श्रीकृष्ण भगवानाने नृसिह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला. या प्रसंगाचा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता. कथेनंतर आ. राजूमामा तथा सुरेश भोळे, बंटी भारंबे, महेश चौधरी, हेमंत खडके यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
संध्याकाळी हरिपाठ घेण्यात आला. रात्री ८ वाजता हभप ईश्वर महाराज, राहुरी यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी पावली खेळून सप्ताहात उत्साह आणला. ही श्रीमदभागवत कथा आणि कीर्तन हे युट्यूबवर लाईव्ह (https://youtube.com/live/TswLFLM7LdA?feature=share) दाखविण्यात येत आहे. भाविकांनी दररोज कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळातर्फे करण्यात आले आहे.