पाचोरा पोलिसांकडून यशस्वी तपास
पाचोरा (प्रतिनिधी) :- बनावट दस्तावेज तयार करून प्लॉट खरेदी करून ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पाचोरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुख्य सूत्रधारास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून फसवणुकीची रक्कम ५ लाख हस्तगत करण्यात आली आहे.

पाचोरा सहदुय्यम निबंधक सतेज सखाराम भास्कर यांच्या फिर्यादीवरुन पाचोरा पोलीस स्टेशनला शीतल सुनीलकुमार पाटील नावाने एक तोतया महिला, एक अनोळखी इसम (वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष), पुंडलिक काशिनाथ पाटील, अक्षय आधार बडगुजर यांच्याविरुद्ध २२ ऑक्टोबर २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपींनी संगनमत करून जारगाव शिवारातील जागा मूळ मालक शीतल सुनीलकुमार पाटील यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड वापरून मूळ मालकाऐवजी दुसरी महिला उभी करून सह दुय्यम निबंधक कार्यालय, पाचोरा येथे बनावट आधारकार्ड खरे म्हणून वापरले आणि २ (दस्त क्र. ६९५७/२०२४) २,८५, ००० रुपये किमतीला नगराज गोविंदा अहिरे यांना खरेदी खत केले. यातून शासनाची व मूळ मालक शीतल सुनीलकुमार पाटील तसेच नगराज गोविंदा अहिरे यांची फसवणूक केली.
यातील मुख्य सूत्रधार आरोपी एक अनोळखी पुरुष (वय ३० ते ३५ वर्ष) हा गुन्हा केल्यापासून फरार होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे, पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मागदर्शनाखाली तपास करीत असताना मुख्य आरोपीस जारगाव चौफुली येथे पोलिसांनी पकडले. त्याने सुरुवातीला उडवाउडवी करीत चुकीचे नावे सांगितले. विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने त्याचे नाव संतोष भिला सोनवणे (वय ३७, रा. नांद्रा, ता. पाचोरा) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. फसवणुकीची रक्कम रोख ५ लाख रुपये तसेच बनावट आधारकार्ड, सातबारा उतारा, खरेदी खताच्या नकला इ. दस्तऐवज पोलिसांनी हस्तगत केले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मागदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी, उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, ज्ञानेश्वर महाजन, राहुल शिंपी, विश्वास देशमुख, योगेश पाटील, सागर पाटील, जितेश पाटील यांच्या पथकाने केली. अटकेतील संशयित आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहे. संशयिताने त्याच्या साथीदारांच्या मदतीने अशाच प्रकारचे गुन्हे यापूर्वी केल्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पाचोरा पोलीस तपास करीत आहेत.









