जळगावच्या व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून रावेरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) :- सेंट्रीग कामासाठी लागणारे ७० नग प्लायवूडचे सीट सावदा येथील एका शेतात उतरवून त्याचे पैसे न देता सॉ मील चालकाची ७७ हजार ८५५ रुपयात एकाने आर्थीक फसवणुक केली. ही घटना बुधवार दि. २८ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी संशयित आसिफ भाई (पूर्ण नाव माहिती नाही, रा. विवरे, ता. रावेर) याच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील आदर्श नगरात राहणारे भावेश पुरुषोत्तम पटेल यांची शिवाजी नगरातील टीम्बर मार्केट परिसरात हनुमान विजय सॉल मील आहे. दि. २७ नोव्हेंबर रोजी त्यांच्याकडे रावेर येथील आसिफ भाई हे सेंट्रींग कामासाठी लागणारे प्लायवुडची ऑर्डर देण्यासाठी आले होते. त्यांना पेमेंटबाबत विचारणा केली असता,
त्यांनी फोनवर सांगतो असे सांगून ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी फोन करुन सेंट्रीग प्लायवुडचा माल रावेर येथे पाठवून द्या त्यानंतर मी सावदा येथून माल सोबत रावेरला कुठे माल उतरवायचा त्याठिकाणी घेवून जाईल. तसेच तुमच्या मालाचे पैसे हे ड्रायव्हरकडे देवून टाकेल असे त्याने सांगितले. त्यानुसार त्यांनी दिलेल्या ऑर्डरप्रमाणे ९० हजार ८३० रुपयांचे ७० प्लायवूडचे सीट (एमएच २०, ईजी १६९१) क्रमांकाच्या मालवाहू वाहन सादीक शेख या ड्रायव्हरसोबत सावदा येथे पाठविला.
वाहन सावदा येथे थांबविल्यानंतर आसिफ भाई हे त्याठिकाणी आले. त्यांनी पाल रोडवरील काझी पेट्रोलपंपाजवळील शेतातील रुममध्ये गाडीमधील ६० सीट सेंट्रींग प्लायवूड उतरविले. त्यानंतर १० सीट ते रावेर येथे घेवून गेले. सावदा नाक्याजवळ आसिफ यांनी गाडी थांबवून सुमारे दोन तास फोनवर बोलून वेळ वाया घालविला. त्यानंतर आसिफ भाई हे ड्रायव्हर सादीक शेख यांना मी माणूस घेवून येतो, असे सांगून ते तेथून निघून गेले आणि मोबाईल बंद करुन ठेवला. त्यांच्यासोबत संपर्क होत नसल्याने सादीक शेख हे वाहन घेवून जळगावला परतले. वारंवार संपर्क साधून देखील आसिफ यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने पटेल यांना आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली. त्यांनी गुरुवार दि. ९ रोजी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार आसिफ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.