२०००-०१ च्या बॅचमधील विद्यार्थ्याने थायलंड येथून दिली उपस्थिती
शिरसोली (वार्ताहर) :- येथील बारी समाज विद्यालयात सन २०००-०१ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये मैत्री सोहळा, गेट-टुगेदर चा कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमासाठी थायलंड देशासह भारतातील इतर मोठ्या शहरातून एकूण १०० विद्यार्थी हजर होते. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात जुन्या आठवणींना उजाळा देऊन एकमेकांची आस्थेवाईक चौकशी केली.
या कार्यक्रमात २०००-०१ वर्षातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी होते. त्यांचा सत्कार या माजी विद्यार्थ्यांनी केला, कार्यक्रमास उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, पी. पी. कोल्हे, पी. एल. काटोले, पी. टी. बारी, आर. के. पाटील, एल. एस. बारी, एल. एस. चौधरी, जी. व्ही. बारी, एस. पी. पाटील, एस. बी. कळसकर, के. झेड. येऊल, एस. एस. बारी, एस. जे. बारी, वैष्णव, कोळी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करुन भावी जीवनात यश संपादनाबरोबर भावी पिढी साक्षर व सुसंकृत कशी घडेल यावर मार्गदर्शन केले.
शाळा भरण्याची सुरुवात जशी होते तशी शाळेची घंटा वाजवून आणि राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली, मग दीप प्रज्वलन करून वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाच पाच मिनिटं शिकवले. त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा सत्कार आणि त्यांचे मनोगत झाले, विद्यार्थ्यांचे मनोगत झाले व सगळ्यात शेवटी सामूहिक भोजनासह मैदानी खेळांचा आनंद विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी लुटला. स्नेहभोजनाचा कार्यक्रम करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
एकत्र शिकणारे शालेय मित्र २४ वर्षांनी भेटणार म्हणून कुठलाही विचार न करता थायलंड वरुन सतिष बारी यांनी थेट शिरसोली गाठून भारत देशाविषयी आदर व्यक्त केला. सूत्रसंचालन समाधान काटोले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.