धरणगाव तालुक्यातील पथराड येथील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील पथराड येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ५ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनला नोंद होऊन धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
अशोक अमृत लंके (वय ४२ वर्ष) हा दोन दिवसांपासून घरात कोणाला न सांगता बेपत्ता होता. या संदर्भात वडील अमृत लंके यांनी दिनांक ५ रोजी पाळधी आऊट पोस्टमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती. अशोक लंकेच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे.
अशोक लंके हे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या नावावर विविध विकास कार्यकारी सोसायटीचे कर्ज असून तसेच बचत गट यांचेसुद्धा कर्ज असून यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतातील पिके वाया गेल्यामुळे अशोक हातबल होता. यावर्षी गिरणा धरण भरल्यामुळे पाटाला पाणी आल्यामुळे रब्बी हंगाम पेरणीसाठी बी-बियाणे व रासायनिक खते घेण्यासाठी पैसे नसल्याने त्याने गावात बऱ्याच लोकांकडे पैशांची मागणी केली. परंतु पैसे न मिळाल्याने त्याने घरी कोणालाच न सांगता घरून निघून गेला होता.
रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत विहीर येथे पाणीपुरवठा शिपाई विहिरीजवळ गेला असता अशोक लंके यांचे प्रेत विहिरीत आढळून आले. वडील व नातेवाईक यांनी विहिरीकडे धाव घेऊन मृतदेह ओळखला. त्यानंतर पाळधी पोलिसांना माहिती देण्यात आली. पाळधी पोलिसांनी प्रेताचा पंचनामा करून लगेच जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची धरणगाव पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.