जळगाव एलसीबीची कामगिरी, धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्यावर पडला होता दरोडा
जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळील फेब्रुवारी महिन्यात १ काेटी ६० लाख रुपयांच्या दराेड्याप्रकरणातील टिल्लूसिंग राजूसिंग टाक वय ३२ हा प्रमुख सुत्रधाराला स्थानिक गुन्हा शाखेच्या पाेलिसांनी गुजरात राज्यातील सुरत येथील परसबाग परिसरातून पायी चालत असताना शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
धरणगाव येथील ‘दुर्गेश इम्पेक्स’ या जिनिंग मीलचे शेतकऱ्यांच्या कापसाचे पेमेंट करण्यासाठी जळगावातील बँकेतून राेकड घेऊन जाणाऱ्या वाहनाला समाेरून धडक देऊन वाहनातील अकाऊंटंट दीपक महाजन, कर्मचारी याेगेश पाटील व चालक उमेश पाटील या तिघांच्या डाेळ्यात मिरची पूड टाकून १ काेटी ६० लाख रुपयांची राेकड लुटण्याची घटना १७ फेब्रुवारी २०२४ राेजी महामार्गावर मुसळी फाट्यावर झाली हाेती. या प्रकरणात चार संशयितांना पाेलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेऊन अटक केली होती. परंतु प्रमुख आराेपी टिल्लूसिंग राजूसिंग टाक (शिकलकर) हा दहा महिन्यांपासून फरार हाेता.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना शिकलकर टोळीतील प्रमुख हा सुरत येथे असल्याचे माहिती तेथील पोलीस अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी एलसीबीच्या पथकाला कळविले. एलसीबीचे उप पोलीस निरीक्षक गणेश वाघमारे, हे.काॅ. प्रमोद लाडवंजारी,नंदलाल पाटील,कीरण धनगर, महेश महाजन,नितीन बाविस्कर, भगवान पाटील, प्रदिप सपकाळे, महेश सोमवंशी,प्रमोद ठाकुर, या
पथकाने सुरत येथे जाऊन परसबाग परिसरातून पायी चालत असलेल्या टिल्लूसिंग राजूसिंग टाक ३२ वर्षीय मुख्य सूत्रधाराला शिताफिने ताब्यात घेत अटक केली आहे. त्याने गुन्हा केल्याची पाेलिसांना कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर या गुन्ह्याचा तपास उप पोलीस निरीक्षक गणेश वाघमारे करीत आहे.