पोलीस अधीक्षकांच्या हस्ते भावपूर्ण सन्मान
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ४ पोलीस उपनिरीक्षक मंगळवार दि. ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा विशेष सन्मान पोलीस अधीक्षकांच्या हस्ते करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील चार उपनिरीक्षक नियत वयोमानाप्रमाणे मंगळवारी सेवानिवृत्त झाले. यामध्ये पोलीस मुख्यालयातील सुनील लक्ष्मण वडनेरे, वरणगाव पोलीस स्टेशन येथील अनिल भानुदास चौधरी, फैजपुर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील शरद जगन्नाथ शिंदे, निंभोरा पोलीस स्टेशन येथील राजेंद्र काशिनाथ पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या हस्ते भावपूर्ण सन्मान करण्यात आला.
यावेळेला सर्व पोलीस उपनिरीक्षक यांचा परिवार उपस्थित होता. डॉ. रेड्डी यांनी सर्व उपनिरीक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. जेव्हा पोलीसाची नोकरी प्राप्त होते तेव्हा कुटुंबांना एक सन्मान प्राप्त झालेला असतो. तेथून नोकरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक पोलिस हा त्याच्या नोकरीच्या काळात संघर्ष करून तसेच देशसेवा बजावीत सेवानिवृत्त होत असतो. चारही पोलीस उपनिरीक्षकांच्या सेवेला सलाम करतो अशा शब्दांमध्ये पोलीस अधीक्षक डॉ. महाश्वेरी रेड्डी यांनी गौरव उद्गार काढले. या वेळेला जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.