यावल तालुक्यातील वड्री येथील घटना
यावल (प्रतिनिधी) :- सातपुड्याच्या पायथ्याशी तालुक्यातील वड्री शेत-शिवारात रानडुकराने धुडगूस घातल्याने शेतकर्याच्या मका पिकाचे प्रचंड नुकसान झाले. सुमारे दीड बीघे क्षेत्रातील मका पिकाची नासधूस झाल्याने शेतकर्याचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी सकाळी निदर्शनास आली. शेतकर्याने वन विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
वड्री गावातील शिवारात राजू छबु तडवी (रा.परसाडे बुद्रुक) यांचे शेत आहे. या क्षेत्रात त्यांनी तीन बिघ्यात मका पीक लावले होते. मका पीक मोठे झाले होते व चांगल्यापैकी मका त्याला लागला होता. या शेतात रानडुकर शिरले आणि त्यांनी त्यांच्या निम्मे शेताचे नुकसान केले आहे. सुमारे दीड बिघे क्षेत्रातील मक्याची नासधूस करण्यात आली. यात शेतकर्यांचे ५० हजारांचे नुकसान झाले. हा प्रकार मंगळवारी सकाळी निदर्शनास आला.
शेतकर्याने वनविभागाकडे, नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. रानडुकरांनी केलेल्या या नासधुसमुळे शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. तर या रानडुकरांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.