जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरात गोंधळ घालणाऱ्या तिघंविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एकाला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा मिळून आला आहे. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पथक दि.२२ डिसेंबर रोजी रात्री सव्वा गस्तीवर असताना इंद्रप्रस्थ नगरात राजाराम नगर मंगल कार्यालय बाहेर वाद सुरु असल्याची माहिती पथकाला मिळाली. शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी उमेश भांडारकर आणि वसीम मलिक हे त्याठिकाणी पोहचले असता गर्दीत मारहाण होत असलेल्या तरुणाला त्यांनी सोडवले. पोलिसांनी त्याचे नाव विचारले असता अतुल बजरंग तांबे (वय-३१ रा.राजगुरू नगर, जि.पुणे) असे त्याने सांगितले. त्याच्यासोबत आणखी २ व्यक्ती असल्याची माहिती नागरिकांनी दिली.
शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रामचंद्र शिखरे, सहायक उपनिरीक्षक सुनील पाटील, हवालदार किशोर निकुंभ, प्रफुल्ल धांडे, भास्कर ठाकरे यांनी धाव घेतली. अतुल तांबे याच्याकडे असलेल्या बॅगेतून गावठी बनावटीचे पिस्तुल आढळून आले. पळून गेलेल्या एकाचे नाव माया तर दुसऱ्याचे माहिती नसल्याचे त्याने सांगितले. हवालदार उमेश भांडारकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अतुल तांबे, माया आणि आणखी एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक हे करीत आहेत.