मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिवेशनात माहिती
नागपूर (विशेष वृत्तसेवा) :- राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवले, त्यांच्या खात्यावर हे अधिवेशन संपल्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता टाकण्यात येईल, अशी माहिती दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये दिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशा उंचावल्या आहेत.
लाडकी बहीण योजना सुरू करून त्याद्वारे निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी विजय मिळवला, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे आता निवडणूक संपली. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद पडेल अशीही माहिती समोर येत होती. मात्र आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी या चर्चावर पडदा पाडला आहे. अधिवेशनामध्ये गुरुवारी दि. १९ डिसेंबर रोजी गुरुवारी दुपारी २ वाजून ३९ मिनिटांनी याबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. कोणतीही शंका मनात ठेवू नका. दिलेले आश्वासन व सुरू केलेल्या योजना आम्ही बंद पडू देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवले, त्यांच्या खात्यावर हे अधिवेशन संपल्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता आम्ही टाकत आहोत. कुठलेही नवीन निकष नाही, असेही त्यांनी आश्र्वस्त केले.
तर, हा जनतेचा पैसा आहे. तो योग्य हातात गेला पाहिजे. असेही लक्षात आले आहे की, काहींनी ४ खाती बनवली आहे. समाजात जशा चांगल्या प्रवृत्ती आहेत, तशा वाईट देखील प्रवृत्ती आहेत. त्यामुळे जनतेचा पैसा हा योग्य प्रकारे योजनांवर वापरला गेला पाहिजे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.