यावल तालुक्यातील बोरखेड्यात घटना
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील बोरखेडा या गावात मंगळवारी वीजबिलाची थकबाकी आणि अनधिकृत वीज वापरणाऱ्यांचे ३५ कनेक्शन बंद करण्यात आले. तसेच ग्रामस्थांनी अभय योजनेत थकबाकी भरावी, असे आवाहनही करण्यात आले.
सांगवी बुद्रुक कक्षांतर्गत येणाऱ्या बोरखेडा गावामध्ये महावितरणचे सहायक अभियंता आकाश नेहेते यांच्या नेतृत्वाखाली थकीत वीजबिल वसुली, तसेच अनधिकृत वीज जोडणी खंडित करण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात आली. गावातील अनधिकृत जोडणी असलेल्या ग्रामस्थांना लवकरात लवकर नवीन वीज जोडणी घेण्यासाठी आवाहन करण्यात आले. महावितरणच्या थकबाकीदारांसाठी अभय योजनेचा लाभार्थी होण्यासाठी आवाहन करीत योजनेचा लाभासाठी पुढाकार घेण्यात आला. गावात ३५ जणांचे कनेक्शन तूर्त कापण्यात आले आहे, तसेच नागरिकांनी वीजचोरी करू नये, अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देण्यात आला.