भुसावळ येथे जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षकांचा छापा
भुसावळ (प्रतिनिधी) :- शहरात वाल्मीक नगर येथे बनावट बुरशीनाशकाचे उत्पादन करत असल्याच्या संशयावरून जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षकांनी छापा टाकला. त्यात ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, विजय पवार यांच्या पथकाने केली.
इंडोफिल इंडस्ट्रीज लि. मुंबई या कंपनीचा लोगो, नाव, पाकिटे तयार करून हे बनावट एम ४५ औषध तयार केले जात होते. विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के व पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
संशयित आरोपी यांच्या वाल्मीक नगर भुसावळ येथे पोलिस पथक व गुणनियंत्रण पथकातील सदस्य यांनी छापा टाकला असता विना परवाना बुरशीनाशक उत्पादन, साठवणूक करत असल्याचे आढळून आले. छाप्यात बनावट एम ४५ बुरशीनाशक पाकिटे १०१०, बुरशीनाशक म्हणून वॉल पुट्टीच्या बॅग, सिलिंग मशीन, बनावट पाकिटे असा मुद्देमाल सापडला आहे. संशयित आरोपी यांना परवाना व उत्पादनविषयी कागदपत्रे व पुरवठादार यांच्याविषयी माहिती विचारली असता, ते देऊ शकले नाहीत.
अधिकृत उत्पादकांच्या वतीने प्रदीप झा यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कारवाईदरम्यान कृषी अधिकारी पंचायत समिती भुसावळ प्रदीप धांडे, मानसिंग भोळे, सुमन राठोड, पो. कॉ. प्रशांत परदेशी यांचे सहकार्य लाभले. तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.