अमळनेर तालुक्यात मारवड पोलीस स्टेशनची कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मारवड येथील शेतातील ट्रॅक्टरमधून बॅटरी चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी गोवर्धन येथील तिघांना मारवड पोलिसांनी अटक केली आहे.
मारवड येथील योगेश अशोक बडगुजर याच्या शेतात दि. १५ रोजी सायंकाळी ट्रॅक्टरचे (एमएच १९, सीयु २९५३) काम झाल्यानंतर ट्रॅक्टर हे गावालगत शेतात लावले होते. १६ रोजी सकाळी चालक रामसिंग बारेला हा ट्रॅक्टर सुरू करायला गेला असता त्याला बॅटरी चोरी गेल्याचे निदर्शनास आले. योगेशजवळ बॅटरीची पावती नसल्याने तो पावती घेण्यासाठी अमळनेर येथील गणेश बॅटरी दुकानावर गेला. बॅटरी चोरी लक्षात येताच दुकानदाराने योगेशला सांगितले की, तीन जण रिक्षामध्ये येऊन त्यांनी तीन बॅटरी विक्रीसाठी आणल्या होत्या, अशी माहिती दिली.
दुकानदाराने रिक्षाचालक गणेश मुकुंदा पाटील (रा. धार) असल्याचे सांगितले. रिक्षाचालकाने तीन जण मारवड परिसरातील सांगून त्यांना ओळखता येईल असे सांगितले. मारवड पोलिसांनी वर्णनावरून आरोपीचा शोध घेतला असता गोवर्धन येथील राहुल सुनील पाटील (वय २६ ), दीपक धोंडू पारधी (वय २१), जयेश गोविंदा पारधी या तिघाना अटक केली आहे.