जळगाव ते भुसावळ महामार्गावरील घटना, एमआयडीसीमध्येही लागली आग
जळगाव (प्रतिनिधी) :- पार्किंग केलेली मारुती सुझुकी कारने मंगळवारी अचानक पेट घेतला. काही अवधीत आगीचा भडका होऊन कारचा सांगाडाच शिल्लक राहिला. दिनांक १० रोजी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास ही घटना भुसावळ राष्ट्रीय महामार्ग खेडी शिवारात कॅन्सर हॉस्पिटलजवळ घडली. मनपाच्या अग्निशमन विभागाने ही आग विझविली. मात्र या आगीत कार जळून खाक झाली. शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात आला.
देवेंद्र स्टील ट्रेडर्स चालकांच्या मालकीची मारुती सुझुकी सियाज (क्र. एमएच १९ एबी ६१३७) ही कार मंगळवारी सकाळी धुळे येथून जळगावला आली. कारमधील व्यक्तींना घरी सोडल्यानंतर कार देवेंद्र स्टील ट्रेडर्स जवळ चालकाने पार्किंग केली. चालक वाहनातून उतरल्यानंतर क्षणातच अचानक कार पेटली. स्थानिक नागरिकांनी पाणी मारून आग विझविण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला.
मनपाच्या अग्नीबंबसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तत्काळ आग विझविण्याच्या कार्याला सुरुवात केली. आग विझविण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. परंतु तोवर कार जळून खाक झाली. अग्निशमन विभागप्रमुख अधिकारी शशिकांत बारी यांच्या मार्गदर्शनात अग्निशमन वाहन चालक देविदास सुरवाडे, गिरीश खडके, रोहिदास पाटील, योगेश पाटील या कर्मचाऱ्यांनी ही आग विझविली. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.
एमआयडीसीमध्ये गोडावूनला आग; भरलेल्या गव्हाचे नुकसान
एमआयडीसीतील गोडावूनला सोमवारी आग लागली. या गोडावूनमध्ये गव्हाच्या पोत्यांचा साठा केलेला होता. मनपाच्या अग्निशमन विभागाने पाण्याचा फवारा मारून आग विझविली. पाणी मारल्याने गव्हाचे नुकसान झाले. सोमवार दि. ९ रोजी एमआयडीसीतील गीतांजली कंपनीसमोरील विश्वभारती फुट कंपनी ई २१ या ठिकाणी ही घटना घडली. कंपनीचे मॅनेजर प्रवीण जैन यांनी गव्हाचे पोते जळाल्याची माहिती दिली. अग्निशमन बंब चालक देविदास सुरवाडे, प्रकाश कुमावत, रोहिदास चौधरी, योगेश पाटील, भगवान पाटील, महेश पाटील, रवींद्र सपकाळे यांनी आग विझविली. परंतु आगीने प्रचंड भडका घेतला. ११.२० वाजेच्या सुमारास मनपा अग्निशमन विभागाला घटनेची खबर देण्यात आली.