पोलिसांनी केला मुद्देमाल जप्त
चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव रेल्वे स्थानकावरुन एक महिला प्रवास करीत रेल्वे गाडीत चढत असताना, गर्दीचा फायदा घेत, तीन भामट्यांनी तिच्या पर्ससह अडीच लाख रुपये लंपास केले होते. याप्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलिस स्थाकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेल्वे पोलिसांनी शिताफीने तिघा भामट्यांना जेरबंद केले आहे. रेल्वे पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे.
दि. ०८ डिसेंबर २४ रोजी शितल कैलास पाखले रा. चाळीसगाव ह्या ट्रेन नं ११०१२ धुळे मुंबई ट्रेनमध्ये चढत असताना, प्रवासी लोकांच्या गर्दीत त्यांच्या खांद्यावर लटकवलेली राखाडी रंगाची लेडीस पर्समध्ये हिरव्या रंगाची कापडी पिशवी त्यात दोन लाख पन्नास हजार रुपये (२,५०,०००) व आधार कार्ड त्यांचे पतीचे आधार कार्ड, पॅनकार्ड व मोटरसायकलची चाबी असा मुद्देमाल प्रवासी लोकांच्या गर्दीत चोरीला गेला. त्यावरून लोहमार्ग पोलिस ठाणे चाळीसगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यात पोलिस अधीक्षक स्वाती भोर, सूर्यकांत बांगर उप विभागीय पोलिस अधिकारी लोहमार्ग मनमाड, प्रभारी अधिकारी सुरेश भाले, रेल्वे सुरक्षा बल येथील अधिकारी चित्रेश जोशी, विभागीय सुरक्षा आयुक्त राजेशकुमार केसरी मनमाड, अतुल टोके निरीक्षक आदिंच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. सदर गुन्ह्यात सीसीटीव्ही फुटेज चेक करून व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरुन लोहमार्ग पोलिस ठाणे चाळीसगाव येथील पोलिस उपनिरीक्षक सुधाकर मोहिते, श्रेणी पीएसआय अनंत रेणुके पो.ना पंकज पाटील, मोसिन अली सय्यद, फरीद तडवी यांनी रेल्वे सुरक्षा बल चाळीसगाव येथील टिम-पी.डी. पाटील उप निरीक्षक, किशोर चौधरी, आरक्षक रेहान अहमद, गोविंद राठोड यांचे मदतीने संशयित आरोपी यांचा शोध घेतला.
संशयित आरोपी अर्जुन उर्फ गोल्ट्या कानिफनाथ भोसले (वय २५) वर्षे रा. मारोती मंदिराजवळ धारनंगाव ता. कोपरगाव जिल्हा अहमदनगर), अक्षय बाळासाहेब नन्नावरे (वय २३ वर्षे, रा. मारोती मंदिराजवळ धारनंगाव ता. कोपरगाव जिल्हा अहमदनगर), विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले.
त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले २ लाख १९ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले आहे. संशयित आरोपी यांना अटक केली असून विधीसंघर्षग्रस्त बालक यांची आजी यांना समजपत्र देवून विधीसंघर्षग्रस्त बालक यास ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.