जळगाव शहरातील यशवंत कॉलनी परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शेअर ट्रेडींगमध्ये ज्यादा मोबदला मिळवून देण्याच्या नावाखाली एका वृद्धाची तब्बल ४२ लाख १५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना शनिवारी ७ डिसेंबर रोजी उघडकीला आली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता रितीका देवी असे नाव सांगणाऱ्या एका मोबाईल धारकाविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील यशवंत कॉलनी परिसरामध्ये ६५ वर्षीय वृद्ध व्यक्ती हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेती काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात १३ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांना एका नंबर वरून रीतिका देवी असे नाव सांगणाऱ्या महिलेने व्हाट्सअप वरून त्यांना एक ॲप्लिकेशन पाठवले. एप्लीकेशनमध्ये त्यांनी माहिती भरली, दरम्यान त्यांना शेअर ट्रेडिंगबाबत माहिती देऊन त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याची त्यांना आमिष दाखविले.
त्यानंतर वृध्दाने सुरूवातीला भरलेल्या ५ लाख रुपयांवर ६ लाख रुपये नफा मिळवून दिला. त्यावर वृध्दाचा विश्वास बसला. त्यानंतर तरूणीने त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण ४२ लाख १५ हजार रुपये वेगवेगळ्या माध्यमातून स्वीकारले व त्यांची फसवणूक केली. दरम्यान आपली फसवणूक झाली आहे असे लक्षात आल्यानंतर वृद्धाने अखेर शनिवारी ७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार राधिका देवी असे नाव सांगणाऱ्या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.