भुसावळ येथील घरफोडी ३ दिवसांत पोलिसांकडून उघड
जळगाव (प्रतिनिधी) :- भुसावळ येथील सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घरात लोखंडाची खिडकी तोडून ३३ तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण २८ लाख ५५ हजाराचा ऐवज चोरीला गेला होता. दरम्यान ही चोरी त्यांच्या जावयानेच केल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडून २१ लाख ५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अनिल हरी ब-हाटे (वय ६४) हे भुसावळ येथील सोमनाथ नगर, शिवशक्ती कॉलनी येथे राहतात. ते लग्नाला गेलेले असताना घराच्या मागील लोखंडी खिडकी तोडून चोरटा घरात शिरला. दि. २ रोजी दुपारी घरात ठेवलेले ३३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रुपये २ लाख ६० हजार रुपये रोख असा एकूण २८ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस अधिक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस यावा या करीता दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पो. उपनिरी. मंगेश जाधव, विजय नेरकर, निलेश चौधरी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, सोपान पाटील, प्रशांत परदेशी, भुषण चौधरी, राहुल वानखेडे, योगेश माळी, जावेद शहा यांचे पथक तयार करण्यात आले. अनिल हरी ब-हाटे यांचा जावई राजेंद्र शरद झांबरे (रा. फेकरी ता. भुसावळ) हा कर्जबाजारी झालेला आहे, अशी माहिती मिळाल्याने गुन्हे शोध पथकाने राजेंद्र शरद झांबरे याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्याच्या कडुन गुन्हयातील चोरीस गेलेला मालापैकी २३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व २ लाख ६० हजार रुपये रोख असा एकुण २१ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल काढुन दिला. सदर आरोपीताने गुन्हयातील गेलेल्या मालापैकी इतर १०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे चोरी केल्याचे कबुली दिली असुन मुद्देमाल हस्तगत करणे बाकी आहे.