राष्ट्रीय मराठी मानसशास्त्र परिषदेत निमंत्रण
जळगाव (प्रतिनिधी) :- मराठी मानसशास्त्र परिषदेतर्फे छत्रपती संभाजीनगर येथील मिलींद कला महाविद्यालयात १३ व १४ डिसेंबर रोजी ३७ वे राज्यस्तरीय १० वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता “बदलते कौटुंबिक स्वास्थ व मुलांचा भविष्यकाळ” या विषयावर विचार करण्यासाठी व मार्गदर्शनासाठी जळगावच्या चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपूते यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे.
विसपूते यांनी निरोगी समाजस्वास्थाबरोबर समाज उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मराठी मानसशास्त्र परिषद ही मानसतज्ञ, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी यांच्या एकजुटीने निरोगी समाज मन:स्वास्थासाठी निर्माण झालेली राज्यव्यापी मानसशास्त्र विषयाची अग्रगण्य व शिखर संस्था आहे. आजवर परिषदेने मानसशास्त्रीय संशोधनास चालना देण्यसासाठी विविधांगी प्रशिक्षण, संशोधन, व्याख्याने, चर्चासत्र, प्रकाशनांचे यशस्वी आयोजन केले आहे. या अधिवेशनात निरोगी मन:स्वास्थ्यासाठी आवश्यक विषयांवरील बिजभाषण, चर्चासत्रे, परिसंवाद, प्रबोधन, तज्ज्ञांच्या मुलाखती, अनुभवकथन असे विविध कार्यक्रम सादर होतील.