शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीत गुलाबरावांचा लवकरच प्रवेश
जळगाव (प्रतिनिधी) :- माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र स्थानिक पातळीवर त्यांच्या प्रवेशाला काही पदाधिकाऱ्यांकडून विरोध असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे देवकरांचा प्रवेश झाला तर अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना जुळवून घ्यावे लागणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांआधी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाला काही प्रमाणात बळ मिळणार आहे. याबाबत गुलाबराव देवकर यांनी देखील दुजोरा दिला आहे. देवकर यांनी गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. तसेच या भेटीदरम्यान देवकर यांनी अजित पवार गटात प्रवेश घेण्याची तयारी दर्शवली.
गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात येण्यास इच्छुक असले तरीदेखील स्थानिक पातळीवर मात्र त्यांना विरोध होत असल्याचे एक चित्र आहे. याबाबत पार्श्वभूमी पाहिली तर विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या प्रचारामध्ये गुलाबराव देवकर यांच्यावर जोरदार टीका टिप्पणी करून त्यांच्या कारभाराचे वाभाडे काढण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी देखील आघाडीवर होते.
तसेच गुलाबराव देवकर पक्षात आले तर आपले वर्चस्व कमी होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतदेखील वरिष्ठ पातळीवर जर देवकरांना विशेष जबाबदारी मिळाली तर आपल्याला देवकरांचे ऐकावें लागेल. म्हणून गुलाबराव देवकर यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक पातळीवरून विरोध असल्याची माहिती मिळाली आहे.