आ. गुलाबराव पाटील यांनी सांगितला एकनाथरावांबद्दलचा सस्पेन्स
मुंबई (वृत्तसेवा) :- शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे हे बुधवारी संध्याकाळपर्यंत उपमुख्यमंत्रिपद स्वीकारायला तयार नव्हते. माझ्याऐवजी दुसरा कोणी तरी उपमुख्यमंत्री म्हणून सांगा असे ते म्हणत होते. मात्र, शिवसेनेच्या आमदारांनी वर्षा बंगल्यावर जाऊन शिंदेंची मनधरणी केली. त्यामुळे शिंदे यांनी आग्रहाखातर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झाल्याची माहिती आ. गुलाबराव पाटील यांनी सांगितले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शपथविधीच्या आदल्या रात्री वर्षा बंगल्यावर घडलेल्या घडामोडींचा तपशील सविस्तरपणे कथन केला.
गुलाबराव पाटील म्हणाले की, आज तिघे जण शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ते कुणालाही भेटत नव्हते, असे नाही. शिंदे यांची उपमुख्यमंत्रिपदाची मानसिकता नव्हतीच. त्यांचे म्हणणे होते की, आमच्यापैकी कोणाला तरी उपमुख्यमंत्री करावे. मात्र, सगळ्यांचे म्हणणे हेच होते की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हावे आणि सत्तेत राहावे. कारण तुम्ही सत्तेत असल्याशिवाय आमदारांना बळ राहणार नाही, असे आम्ही त्यांना सांगितले. त्यांनी आमच्या विनंतीचा सन्मान ठेवला. काही लोक म्हणत होते ते भेटत नाही. पण इलेक्शन आटोपल्यानंतर मी सुद्धा पाच ते सहा दिवस आजारी पडलो होतो.
एकनाथ शिंदे यांनी तर दररोज आठ-दहा सभा घेतल्या. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सर्वांसाठी काम केले. दोन महिन्याची केलेली कसरत आता बाहेर निघत आहे. त्यामुळे ते बाहेर निघत आहे. त्याचा अर्थ जर कोणी चुकीचा काढत असेल तर ते योग्य नाही. शरीर थकल्यानंतर माणूस आराम करणारच. आम्ही काल एकनाथ शिंदेंना भेटलो तेव्हा सुद्धा तिथे दोन-तीन डॉक्टर बसले होते. सगल्या आमदारांना ते भेटले, त्यांचा मान राखला, त्याबद्दल आम्ही एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. गृह खात्यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. गृहखाते एकनाथ शिंदे यांना मिळावे, ही आमची अजूनही मागणी आहे. मात्र तिन्ही नेते बसून ठरवतील आणि ते योग्य ते निर्णय घेतील. शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल, असे गुलाबराव पाटील यावेळी म्हटले.