छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांकित लॅबचालकासह दोघांवर गुन्हा दाखल
जळगाव (विशेष प्रतिनिधी) : – लॅबोरेटरीमधील रुणाच्या रिपोर्टवर जळगावच्या डॉक्टराची सही व नोंदणी क्रमांकाचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगर येथील पिसादेवी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीच्या चालक आणि मालकाविरुद्ध जळगाव शहरात गुन्हा नोंद झाला. यानंतर हा गुन्हा छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको आणि तेथून चिकलठाणा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
डॉ. राहुल रवींद्र मयूर (वय ४९, रा. अनंत हाउसिंग सोसायटी, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. मयूर हे जळगाव येथील निपुण पॅथॉलॉजी लॅबोरेटरी येथे चाचणी अहवाल करण्याचा वैद्यकीय व्यवसाय करतात. दि. १७ नोव्हेंबरला त्यांना एका इन्श्युरन्स क्लेम इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या इम्रान शेख यांनी फोन केला. (केसीएन)शेख यांनी डॉ. मयूर यांच्या व्हॉट्सअॅपवर छत्रपती संभाजीनगर येथील पिसादेवी पॅथॉलॉजी लॅबोरेटरी या लॅबमधील राहुल सुधाकर खैरे या रुग्णाचे ७ ऑक्टोबर २०२४ चे रिपोर्ट पाठवले. हे रिपोर्ट डॉ. मयूर यांनी तयार करून प्रमाणित केले आहेत का, याची विचारणा शेख यांनी केली.
यावेळी डॉ. मयूर यांनी, या रिपोर्टवर माझे नाव छापले असले तरी हे रिपोर्ट आपण प्रमाणित केले नसून ही सही आपली नाही; नोंदणी क्रमांक ८७४१७ चा गैरवापर झाला आहे. यामुळे माझ्यासह रुग्णाची फसवणूक झाली आहे.(केसीएन)तसेच आपण छत्रपती संभाजीनगर येथे व्यवसाय करीत नसून पिसादेवी पॅथॉलॉजीशी आपला काही संबंध नसल्याचा खुलासा केला. याप्रकरणी डॉ. मयूर यांच्या तक्रारीवरून पिसादेवी पॅथालॉजी लॅबोरेटरीच्या चालक आणि मालकाविरुद्ध सुरवातीला जळगाव येथील पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.
मात्र, हा प्रकार छत्रपती संभाजीनगरातील असल्याने सिडको पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. ही लॅबोरेटरी चिकलठाणा पोलिस ठाणे हद्दीत असल्याने चिकलठाणा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.(केसीएन)बोगस रिपोर्ट देण्याऱ्या पॅथॉलॉजी लॅबचा सुळसुळाट असल्याचे चित्र आता स्पष्ट होत असून प्रशासनाने याबाबत तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनने केली आहे.
डॉ. राहुल मयूर यांनी, “केसरीराज” शी बोलताना सांगितले की, पिसादेवी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पिसादेवी लॅबोरेटरी यांनी माझ्या नावाचा व नोंदणी क्रमांकाचा गैरवापर करून माझ्यासह रुग्णाची गंभीर फसवणूक केली आहे. याबाबत राज्य शासनाने लक्ष घालून सखोल चौकशी केली पाहिजे. तसेच, राज्यभरात रिपोर्ट तपासणी मोहीम राबविली पाहिजे, असेही ते म्हणाले.