भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची समाजमाध्यमातून माहिती
जळगाव (प्रतिनिधी) :- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दि. ३० नोव्हेंबर रोजी समाजमाध्यमातून राज्याच्या सत्तास्थापनेची माहिती दिली आहे. गुरुवारी दि. ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता मुंबईत आझाद मैदानावर महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती देताना मात्र बऱ्याच गोष्टींबाबत गोपनीयता बाळगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होतील असे जवळपास निश्चित असताना मात्र भाजप पक्षश्रेष्ठींच्या मनात काय असा प्रश्न अजूनही निर्माण झालेला आहे. तर उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादीकडून अजितदादा हेच सातव्यांदा शपथ घेतील. शिवसेनेकडून मात्र अद्यापही सस्पेन्स असून उप मुख्यमंत्री म्हणून दादा भुसे, शंभूराज देसाई यांची नवे आघाडीवर आहेत. नवीन मंत्रिमंडळात नवीन चेहरे राज्याचा कारभार करतील अशी माहिती भाजप सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे अनेकांना डच्चू मिळून त्यांना पक्ष संघटनाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे दिसून येणार आहे.