जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंप परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील राष्ट्रीय महामार्गाजवळ असणाऱ्या गुजराल पेट्रोल पंप मागील परिसरात असलेल्या प्रवीण अकॅडमीच्या शिक्षकाने अकॅडमीच्या वर असलेल्या राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
राहुल अंबादास पाटील (वय ३५, रा.प्रवीण अकॅडमी, जळगाव) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. तो आई-वडील, पत्नी, भाऊ, यांच्यासह राहत होता. प्रवीण अकॅडमी येथे गेल्या ९ वर्षापासून तो शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवत होता. (केसीएन)दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तो पोटाच्या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. दरम्यान गुरुवारी दि. २८ रोजी दुपारी दोन ते तीन या वेळेत त्यांनी अकॅडमीत एक्स्ट्रा तासिका घेतली. त्यानंतर राहुल पाटील हे अकॅडमीच्या वर असलेल्या राहत्या घरी गेले आणि त्यांनी ३ वाजेच्या सुमारास राहुल पाटील यांनी घरी ओढणीच्या साहह्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.
कुटुंबीयांना कळताच त्यांनी आजूबाजूंच्या नागरिकांच्या मदतीने राहुल पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. (केसीएन) या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून राहुल पाटील यांना मयत घोषित केले. या वेळेला कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
राहुल पाटील यांनी, पोटाच्या आजारामुळे ग्रस्त असल्यामुळे आत्महत्या करीत आहे. याला कोणालाही दोषी धरू नका अशा आशयाची चिट्ठी लिहिल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. दरम्यान गेल्या चार ते पाच दिवसांपासून जळगाव तालुक्यात सातत्याने आत्महत्यांचे सत्र सुरू असल्यामुळे खळबळ उडाली असून समाजमन सुन्न झाले आहे.
काय म्हटले आहे, सुसाईड नोट मध्ये ?
मी, राहुल पाटील असे लिहून देतो कि, माझ्या पोटाच्या विकारांमुळे तसेच सततच्या आजारपणामुळे हे पाऊल उचलत आहे. माझ्या या गोष्टीला कोणीही जबाबदार नसेल. सॉरी फॉर ऑल ऑफ यू… माझ्या आत्महत्येमागे प्रवीण अकॅडमीचा कुठेही संबंध नाही. त्यामुळे त्यांची बदनामी कोणीही करू नये हि विनंती.