पाचोरा शहरातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील भडगाव रोडवर समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या हेडलाईटच्या प्रकाशामुळे दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी थेट ट्रॅक्टरवर आदळल्याने एका ५६ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. पाचोरा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
बापू सोमनाथ जगताप (वय ५६ रा. कजगाव ता.भडगाव) असे मयत प्रौढाचे नाव आहे. बापू जगताप हे पत्नी, दोन मुलं आणि सुना यांच्यासह भडगाव तालुक्यातील कजगाव येथे वास्तव्याला होते. मंगळवारी दिनांक २६ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ते पाचोराकडून भडगाव येथे जात असतांना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या हेडलाईटच्या प्रकाशामुळे त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला.
त्यांची दुचाकी थेट ट्रॅक्टरवर आदळली. या अपघात बापू जगताप हे गंभीर जखमी झाले. त्यांना चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असतांना रस्त्यावरच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीसात नोंद करण्याचे काम सुरू होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पाचोरा पोलीस स्टेशन येथे घटनेची नोंद करण्यात आली आहे.