रावेर शहरातील भरदुपारी घटना
रावेर (प्रतिनिधी) :- येथील एका बँकेसमोर उभ्या असलेल्या कार मधून अज्ञात चोरटयांनी ५ लाख रुपये असलेली बॅग पाळत ठेऊन लांबविल्याची धक्कादायक घटना भरदुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध लावणे सुरु केले आहे.
विशाल पाटील (रा. मोठा वाघोदा ता. रावेर) हे रावेर शहरात मंगळवारी दुपारी आले होते.त्यावेळी त्यांची काळ्या रंगाची इनोव्हा कार ( एमएच १९ डीव्ही ०६६६) जवळ ते काही लोकांशी बोलत उभे होते. त्याचवेळेस त्यांची नजर चुकवून अज्ञात चोरटयांनी त्यांच्या कारमधील ५ लाख रुपये असलेली बॅग लांबविल्याची धाडसी घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे.
यानंतर त्यांनी रावेर पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानुसार निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी घटनास्थळी पथकासह दाखल होऊन माहिती घेतली. दरम्यान, काही सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात काही चोरटे दिसत असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.