जळगाव शहरातील गणेश कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील गणेश कॉलनी परिसरातील १४ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघड झाली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
ओम उर्फ साई पंडित चव्हाण (वय १४) असे मयत बालकाचे नाव आहे. तो आई-वडील, बहिण यांच्यासह राहत होता. ओमचे वडील पंडित चव्हाण हे ब्रोकरचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहे. (केसीएन)दरम्यान सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी घरी ओम हा एकटाच असताना त्याने कुठल्यातरी कारणावरून छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. दुपारी ४ वाजेच्या सुमारास वडील घरी आले असता त्यांना दरवाजा बंद दिसला.
त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता ओम चव्हाण हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. (केसीएन)यावेळी पित्याने एकच हंबरडा फोडला. नातेवाईकांनी ओमचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. ओम चव्हाण हा इयत्ता नववीचा विद्यार्थी होता. त्याने आत्महत्या का केली याबाबत कारण अजून अस्पष्ट आहे. दरम्यान जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू केले होते.