यावल तालुक्यातील सावखेडा सीम येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : रावेर- यावल विधानसभेच्या मतदानापूर्वी रात्री अज्ञात हल्लेखोराकडून तालुक्यातील सावखेडा सिम येथील राहणाऱ्या शेती व ठेकेदारीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला काहींनी गैरसमजीतीतून मारहाण करण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील सावखेडा सिम येथील कमलाकर तुळशीराम पाटील (वय ४७) हे दिनांक २० नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास यावल शहरापासून काही अतंरावर असलेल्या फॉरेस्ट नाका, विरावली रोड मार्गाने चारचाकी (एमएच १२, एमएम ९९००) ने आपल्या घरी जात होते. ते तंबाखू खाण्यासाठी फॉरेस्ट नाक्याजवळ थांबले असता अचानक ३०ते ४० वयोगटातील ५ ते ६ जणांनी कमलाकर पाटील यांना मारहाण केली. दरम्यान, एका उमेदवाराविरूद्ध पैसे वाटप करत असल्याच्या गैरसमजातून पाटील यांची कॉलर पकडून शिवीगाळ करून लोखंडी रॉडने चारचाकी वाहनाच्या चारही बाजुच्या काचा फोडल्या.
तसेच त्यांच्या खिशातील पाकीट काढून घेत घटनास्थळावरून पळ काढला. याबाबत कमलाकर पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात या घटनेचा तपास सुरु आहे.