नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी (दि. 26) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माध्यमाशी संवाद साधला. राहुल गांधी यांच्या अभिभाषणाची व्हिडिओक्लिप शेअर करून दिल्लीतील भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. कपिल मिश्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधी यांच्यावर टिका करताना म्हटले आहे की, राहुल गांधी तुम्ही रोज अशीच प्रेस कॉन्फरन्स घेत जा…आणि काँग्रेसची लंका जाळत राहा…सदाबहार युवराज, खूप मजा येते. दिल्ली भाजप नेते कपिल मिश्रा यांनी केलेल्या ट्विटला अनेकांनी प्रतिक्रीय दिल्या आहेत. आत्तपर्यंत 13 हजार लोकांनी हे ट्विट पाहीले आहे आणि त्याला रिट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कपिल मिश्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये राहुल गांधी महाराष्ट्रावर प्रतिक्रिया देताना म्हटले, महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे. मात्र, मोठे निर्णय घेण्याचे अधिकार नाही. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तिथे आम्ही निर्णय घेऊ शकतो. मात्र, केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळायला हवी. महाराष्ट्र हे एक महत्त्वाचे राज्य आहे हे मी स्पष्टपणे सांगितले आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असून त्यावर लोकांचे लक्ष केंद्रीत आहे. या ठिकाणी कठिण परिस्थीती आहे आणि केंद्राकडून महाराष्ट्रावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही केवळ केंद्र सरकारला याबाबत सूचना देऊ शकतो. परंतु नेमके काय करायचे हे केंद्र सरकारवर अवलंबून आहे. केंद्र सरकार राज्य सरकारांना पाठिंबा देत नाही त्यामुळे राज्य सरकारला काम करणं अवघड होत आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न करू नका.
राहुल गांधींच्या महाराष्ट्र सरकारवरील विधानावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधींना फक्त शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोष द्यायचे आहेत.