विश्लेषण : जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात पुन्हा एकदा पारंपारिक प्रतिस्पर्धी गुलाबराव देवकर हे उभे ठाकले आहेत. दोघांमध्येही जोरदार प्रचार झाला असून निवडणूक निकालामध्ये कोणाचे पारडे जड हे दिसून येणार आहे. या हायव्होल्टेज निवडणुकीकडे पूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील हे पुन्हा निवडणूक लढवित असून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांना तिकीट मिळाले आहे. मागील पंचवार्षिक २०१९ साली शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना १ लाख ५ हजार ७९५ इतकी मते तर अपक्ष चंद्रशेखर अत्तरदे यांना ५९ हजार ६६ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुष्पा महाजन यांना १७ हजार ९६२ इतकी मते मिळाली होती.
जळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये ३ लाख ३४ हजार ३६ इतके मतदार असून १ लाख ७१ हजार १५८ पुरुष, १ लाख ६२ हजार ८७४ महिला मतदार तर ४ तृतीयपंथी मतदार आहेत. या मतदारसंघांमध्ये सर्व समाजाचे लोक सारख्या प्रमाणात राहतात. २००९ मध्ये जळगाव ग्रामीण मतदार संघाची निर्मिती झाली. त्यानंतर गुलाबराव देवकर यांनी गुलाबराव पाटील यांचा पराभव करून विजयी झाले होते.
नंतर २०१४ व २०१९ साली शिवसेना नेते गुलाबराव पाटील हे विजयी झाले आहेत. आता पुन्हा ते विजयाची हॅट्रिक करण्याच्या मनसुब्यात असून जनतेचा त्यांनी कौल मागितला आहे. मागील दोन्ही वेळेला त्यांना मंत्रिपदे मिळाली असून यंदा विजयी झाल्यास पक्ष त्यांच्यावर कोणती जबाबदारी टाकेल याकडे देखील जनतेचे लक्ष लागून राहील.