विश्लेषण : चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ
.जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- चाळीसगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन जिवलग मित्रांमध्ये “काटे की टक्कर” दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खा. उन्मेष पाटील व महायुतीचे उमेदवार आ. मंगेश चव्हाण यांच्यात मुख्य लढत रंगत आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत २०१९ साली भाजपाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांना ८५ हजार २८६ एवढी मते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजीव देशमुख यांना ८२ हजार २२८ इतकी मते मिळाली होती. यंदा राजीव देशमुख हे महाविकास आघाडीचे घटक असून उन्मेष पाटील यांच्यासोबत त्यांनी प्रचार केला आहे. आ. मंगेश चव्हाण यांच्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तर उन्मेश पाटील यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली आहे.
माजी खासदार उन्मेष पाटील हे शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार असून त्यांना ग्रामीण भागातून मिळणारा प्रतिसाद महत्त्वाचा ठरणार आहे. आ. मंगेश चव्हाण हे केलेल्या विकास कामांच्या बळावर निवडणुकीच्या रिंगणात सामोरे गेले असून माजी खा. उन्मेष पाटील यांनी समस्या मांडण्यावर भर दिला आहे. या मतदारसंघात ३ लाख ६९ हजार ९२६ इतके मतदार असून १ लाख ९४ हजार ३५८ पुरुष तर १ लाख ७५ हजार ५३८ महिला मतदार आहे. ३० तृतीयपंथी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. चार जिल्ह्यांना जोडणारा तालुका म्हणून चाळीसगावच नाव असून या महत्त्वाच्या मतदारसंघात महायुती की महाविकास आघाडी हा विषय चर्चेला आलेला आहे.