विश्लेषण : रावेर-यावल विधानसभा मतदारसंघ
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- रावेर यावल विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्यासमोर महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांनी आव्हान दिले आहे. यंदा आ. शिरीष चौधरी यांनी त्यांचे पुत्र धनंजय चौधरी यांना तिकीट मिळवून दिल्याने नवीन उमेदवार मतदारसंघाला मिळू शकतो.
धनंजय चौधरी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार असून अमोल जावळे हे भाजपाकडून निवडणूक लढवित आहेत. दोघेही तुल्यबळ उमेदवार असून या लढतीकडे देखील खान्देशात लक्ष लागून आहे. त्यांच्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिल चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शमीभा पाटील यांच्यासह काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार दारा मोहम्मद यांनी देखील आव्हान दिले आहे. या मतदारसंघात ९ उमेदवार असून प्रचारामध्ये सर्व उमेदवारांनी प्रभावी मुद्दे मांडत जनतेकडे आशीर्वाद मागितले आहेत.
मागील पंचवार्षिकला २०१९ साली काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. शिरीष चौधरी यांना ७७ हजार ९४१ इतकी मते तर भाजपचे हरिभाऊ जावळे यांना ६२ हजार ३३२ एवढी मते मिळाली होती. यंदा दोघांचेही सुपुत्र निवडणूक लढवीत आहेत. तर त्यावेळी अपक्ष असलेले अनिल चौधरी यांनी ४४ हजार ८४१ इतकी मते मिळवून लक्ष वेधून घेतले होते. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या शमीभा पाटील यांचाही जनसंपर्क चांगला असल्यामुळे त्यांनाही चांगली मते मिळू शकतात.
यंदाच्या निवडणुकीत देखील मतांचे होऊ शकणारे विभाजन कोणाच्या फायद्याचे ठरते हे भविष्यात दिसून येणार आहे. रावेर यावल विधानसभा मतदारसंघात ३ लाख ५ हजार ४८४ इतके मतदार असून पुरुष १ लाख ५६ हजार ८५२, महिला १ लाख ४८ हजार ६२९ तर ३ तृतीयपंथी मतदार आहेत. यावल तालुक्याचा मध्य,पूर्व भाग या मतदारसंघात येतो. हा भाग केळी पट्ट्याचा असल्यामुळे केळी प्रश्नांवर उमेदवारांनी प्रचारामध्ये भर दिल्याचे दिसून आले आहे.