चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- चाळीसगाव शहर आणि परिसरात करण्यात आलेल्या विविध कारवाईदरम्यान दोघांना गावठी बनावटीच्या पिस्टलसह अटक करण्यात आली आहे. दोघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवम कैलास जगताप आणि अभिजीत चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.
पहिल्या कारवाईत चाळीसगाव शहरात पेट्रोलिंग दरम्यान पोलिस नाईक राहुल पाटील यांना समजलेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. या कारवाईत चाळीसगाव भडगाव रोडवरील वडाळा वडाळी फाटयानजीक माऊली हॉटेल जवळ शिवम कैलास जगताप याला गावठी बनावटीच्या पिस्टल व चार जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकुण ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुस-या कारवाईत हे.कॉ. सुधाकर अंभोरे यांना समजलेल्या माहितीच्या आधारे चाळीसगाव भडगाव रोडवरील अंबिका हॉटेल जवळ अभिजीत रतन चव्हाण याच्या कब्जातून गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत. त्याच्या ताब्यातून एकुण ३२हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील अभीजीत चव्हाण याने त्याच्याकडील पिस्टल पाचोरा येथील समाधान बळीराम निकम याच्याकडून विकत घेतल्याचे त्याने कथन केले. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासकामी समाधान निकम याला देखील अटक करण्यात आली आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक कुणाल चव्हाण करत आहेत. दोघा आरोपींना ३ दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.