माजी नगराध्यक्ष पारस ललवाणींच्या पत्रकार परिषदेत खळबळजनक खुलासा
जामनेर येथे काल झालेल्या पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष पारसभाऊ ललवाणी यांनी थेट ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांवर गंभीर आरोप करत, त्यांचा विकासाचा दावा फक्त दिखावा असल्याचे म्हटले. ललवाणी म्हणाले, “महाजन म्हणतात त्यांनी जामनेरचा विकास केला, पण त्याच विकासामुळे येथील तरुण बेरोजगार राहिले, सामान्य जनता वंचित राहिली, आणि फक्त त्यांच्या निकटवर्तीयांनीच लाभ घेतला.
ललवाणी यांनी आरोप केला की महाजन यांच्या नेतृत्वात केवळ ठेकेदार आणि पुढारी मोठे झाले आहेत, तर जामनेरची सामान्य जनता विकासापासून कोसो दूर राहिली आहे. “जो विकास झाला तो फक्त तुमच्या दारात झाला, जनतेच्या काय फायद्याचा झाला? असा सवाल ललवाणी यांनी उपस्थित केला.
खोटे गुन्हे आणि दडपशाहीचे आरोप
ललवाणी म्हणाले, महाजन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विरोधकांना दडपण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले. माझ्यावरही खोटे पोस्को गुन्हे लावण्यात आले, आणि त्यात माझ्या कुटुंबातील सदस्यांनाही गोवण्यात आले. त्यांनी शंकर राजपूत आणि अनिल बोहरा यांच्यावरही खोटे आरोप करून त्यांना त्रास देण्यात आल्याचे सांगितले.
विकासाऐवजी तालुका भकास
ललवाणी यांनी पुढे आरोप केले की जामनेर तालुक्यात अद्याप पाणीटंचाई, उपजिल्हा रुग्णालयात अपुरी सेवा, आणि रोजगाराच्या कमी संधी आहेत. गिरीशभाऊ, तुमचा विकास फक्त गल्लोगल्ली फिरताना दिसतो, पण सामान्य जनतेसाठी त्याचा काहीही उपयोग नाही,” असे ललवाणी म्हणाले.
महाजनांच्या सत्तेचा अंत जवळ
ललवाणी यांनी ठामपणे सांगितले की, महाजनांची सत्तेची मस्ती आता संपत आली आहे. आता त्यांना घरी बसवल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही.
या पत्रकार परिषदेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आगामी निवडणुकीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.