डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील बालरोग तज्ज्ञांना यश
जळगाव – शहरातील एका तीन वर्षीय हिमोफिलीयाग्रस्त बालकावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाच्या बालरोग विभागात तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या उपचाराला यश आले आहे. योग्य निदान आणि उपचारामुळे बालकाची प्रकृती अगदी ठणठणीत झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको येथील गोकुळ भालेराव यांचा मुलगा आर्यन भालेराव (वय ३) याच्या ओठातून अचानक रक्तस्त्राव सुरू झाला होता. सुरूवातीला त्याला तातडीने स्थानिक डॉक्टरांकडे दाखविण्यात आले. त्यांनी लागलीच डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. गोकुळ भालेराव यांनी मुलगा आर्यन यास तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाच्या पीआयसीसू विभागात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी बालरोग तज्ज्ञ डॉ. उमाकांत अणेकर यांनी बालकाची तपासणी केली. ओठातून होणार्या अतिरक्तस्त्रावावर उपचार करण्यात आले. परंतु रक्तस्त्राव काही केल्या थांबेना. अखेर आर्यन याची फॅक्टर ८ आणि फॅक्टर ९ ची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती हिमोफिलीया या आजाराचे निदान करण्यात आले. अतिरक्तस्त्रावामुळे आर्यनच्या शरीरातील रक्त अत्यंत कमी झाले होते. अशा परिस्थितीत त्याला चार रक्ताच्या पिशव्या लावण्यात आल्या. त्यानंतर त्याच्यावर आवश्यक ते तातडीचे उपचार करण्यात आले. अचूक निदान आणि योग्य उपचारामुळे आर्यन ह्याची प्रकृती धोक्याबाहेर येऊन त्याचा जीव वाचला. आर्यनवर महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यात आले. आर्यनची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्याच्या कुटूंबियांनी डॉक्टरांचे आभार मानले. उपचारासाठी डॉ. कुशल धांडे, डॉ. ओमश्री गुडे, डॉ. चंदाराणी देगूलरकर, डॉ. भारती झोपे यांनी सहकार्य केले.
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या अहवालानुसार, हिमोफिलिया हा एक दुर्मिळ रक्त विकार आहे, ज्यामुळे रक्ताची व्यवस्थित गुठळी होत नाही, ते पातळ राहतं. रक्तातील प्रथिने गोठण्याच्या अनुपस्थितीमुळे असे घडते. या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना दुखापत झाल्यास त्यांचे खूप रक्त वाहू शकते. या विकारामुळे शरीराच्या आत रक्तस्राव होऊ शकतो. हिमोफिलियामुळे गुडघे, घोटे आणि कोपरांमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो. अंतर्गत रक्तस्त्राव तुमच्या शरीरातील अवयव आणि ऊतींना नुकसान पोहोचवू शकतो आणि जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे या आजाराबाबत काळजी घेण्याची गरज आहे.