मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहिर सभेत आवाहन
पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा-एरंडोल मतदारसंघ हा पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील हे या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे झालेल्या प्रचारसभेत केले. दरम्यान, भाषणात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीत उठाव केला नसतातर कदाचित मंत्री गिरीश महाजनांसह भाजपाचे अनेक नेते आज कारागृहात राहिले असते. उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धत्तीवर यावेळी शिंदे यांनी सडकून टीका केली.
मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, दोन वर्षांपूर्वीच्या उठावात आमदार चिमणराव पाटील आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून होते. अन्याय सहन करायचा नाही, पेटून उठायचे हे स्व.बाळासाहेबांनी शिकवले आहे व आम्ही धाडस केले नसते, उठाव केला नसता तर शिवसेना विकली गेली असती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व कामांना स्थगिती मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
लाडक्या बहिणींसाठी जेलमध्येही जाणार !
आम्ही सत्तेच्या विरोधात गेलो, पायउतार झालो मात्र अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात आम्ही मतदारसंघात भरभरून निधी दिला. पारोळा-एरंडोल मतदारसंघासाठी सुमारे तीन हजार कोटींचा निधी दिला. आमचे सरकार देना बँक आहे, लेना बँक नाही. हप्ते घेवून जेलमध्ये जाणारे सरकार आमचे नाही, तर लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आमचे आहे. लाडक्या बहिणींसाठी प्रसंगी आम्हाला जेलवारी करावी लागली तरी बेहतर, असेही मुख्यमंत्री म्हणाले. एरंडोल-पारोळा मतदारसंघातील घरा-घरात आमदार चिमणराव पाटील पोहोचले आहेत. आ. चिमणराव पाटील हे लोकांच्या मनातील लोकप्रिय आमदार असून आधी ते कामे करतात मगच बोलतात. आता महायुतीने त्यांच्या मुलाला अर्थात् अमोल पाटील यांना तिकीट दिले असून आपली सर्वांची त्यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याची जवाबदारी असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
तर गिरीश महाजन कारागृहात असते..!
मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीचे सरकार उलथवले नसते तर पहिले कारागृहात जाण्याचा क्रमांक गिरीश महाजनांचा व नंतर भाजपातील अनेक नेत्यांचा होता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला. अनेकांना जेलमध्ये टाकण्याची महाविकास आघाडीची व्यूहरचना होती, असेही मुख्यमंत्री म्हणाले. व्यासपीठावर मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.