जळगाव शहरातील जुना असोदा रोड परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- दोन भावांच्या सामाईक घरांपैकी एकाच्या घराचा दरवाजा बंद करणे राहून गेल्याने चोरट्याने घरात प्रवेश करून घरातून रोख १ लाख ३० हजार रुपयांसह १९ तोळे साडेआठ ग्रॅम सोने, पाऊण किलो चांदी, असा एकूण नऊ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ११ नोव्हेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुवर्ण कारागीर असलेले जगदीश प्रकाश सोनार (३९) व त्यांचे भाऊ राजेंद्र सोनार यांचे जगन्नाथ महाराज नगर, जुना आसोदा रोड परिसरात सामाईक घर आहे. १० नोव्हेंबर रोजी घरातील सर्व सदस्य रात्री ११ ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान झोपले. त्यावेळी राजेंद्र सोनार यांच्या घराच्या हॉलचा दरवाजा आतून बंद करण्याचा राहून गेला. त्यामुळे चोरट्याने घराचा दरवाजा ढकलून घरात प्रवेश केला. त्यानंतर राजेंद्र यांच्या कपाटातून रोख एक लाख ३० हजार रुपये व दोन्ही भावांच्या घरातून एकूण १९ तोळे साडेआठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व पाऊण किलो (७५० ग्रॅम) चांदीचे दागिने, देवीदेवतांच्या मूर्ती, शिक्के, असा एकूण नऊ लाख ५४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
जगदीश सोनार हे भावाच्या घरात जात असताना त्यांच्या सामाईक दरवाजाची कडी लावलेली होती. त्यामुळे घरात कोणीतरी शिरल्याचा संशय त्यांना आला. तसेच भावाच्या घरातील कपाटाचा दरवाजा वाकलेला व त्याचे लॉकर तोडलेले आढळले.
पहाटे जगदीश सोनार यांच्या पत्नी भावना यांना जाग आली असता, त्यांना कपाटाचा दरवाजा उघडा व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच राजेंद्र यांच्या घरातही जाऊन पाहिले असता, त्यांच्याही घरात साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोउनि चंद्रकांत धनके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. तसेच श्वान पथक व ठसे तज्ज्ञही पोहोचले. श्वान पथकाने काही अंतरापर्यंत माग काढला. याप्रकरणी जगदीश सोनार यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच तोळे सोने सापडले घरातच
जगदीश सोनार यांच्या घरात घरफोडी झाल्यानंतर त्यांनी तक्रार दिली. त्यानंतर पाच तोळे सोने त्यांच्याच घरात सापडले. यामध्ये मंगळसूत्र व इतर दागिन्यांचा समावेश आहे.